भार्इंदर : उत्तन-गोराई येथील विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर गोराई येथील प्रस्तावित लॉ कॉलेजसाठी ६० एकर जमीन निश्चित केली आहे. परंतु, त्या नावाखाली थेट २०० एकर जमिनीचे सर्वेक्षण एमएमआरडीएकडून होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी गोराईकरांनी गुरुवारी जामदारपाडा येथे निदर्शने केली. दरम्यान, आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला मे २०१६ मध्ये मंजुरी दिल्यानंतर १२ जून २०१६ मध्ये २०० एकर जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी सर्वेक्षण न करता २८ जूनला सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले. त्या वेळी ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी कंबर कसली होती. परंतु, तेव्हाही अधिकारी सर्वेक्षणासाठी आले नाहीत. १६ सप्टेंबरला एमएमआरडीएने ग्रामस्थांना नोटिसा बजावल्या. त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार विकास आराखड्यात तेथील ६० एकर जागा लॉ कॉलेजसाठी निश्चित केल्याचे सांगून त्याचेच सर्वेक्षण होत असल्याचे सांगण्यात आले. भूमिपुत्रांना सरकारने हटवण्याचा डाव रचल्याने होणारे सर्वेक्षण बेकायदा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ९ जानेवारीला सर्वेक्षण होणार होते. त्या वेळीही परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, अधिकारीच न आल्याने तो बारगळला. बुधवारी एकाच कुटुंबाला सर्वेक्षणाची नोटीस बजावली. इतरांना मात्र नोटीस न बजावता त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. (प्रतिनिधी)
लॉ कॉलेजच्या नावाखाली सर्वेक्षण
By admin | Published: January 13, 2017 6:52 AM