ठाणे : ठाण्यात गॅलरीत लावलेल्या ग्रीलमध्ये मान अडकलेल्या पोपटाची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी ९ ते ९.३०च्या सुमारास घडला. या घटनेत पोपटाच्या मानेला दुखापत झाल्याने त्याला तातडीने पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात दाखल केले आहे.
ठाण्यातील मीनाताई ठाकरे सर्कल येथील सुममेर कॅस्टल येथील ‘फ’ विंगच्या नवव्या मजल्यावर संजीव कोकीळ राहतात. त्या घराच्या गॅलरीला ग्रील लावले आहे. त्यातच कोकीळ यांच्या गॅलरीत नेहमीच पशुपक्षी ये-जा करतात. गुरुवारी सकाळी एक पोपट त्यांच्या ग्रीलवर येऊन बसला असताना, त्याची मान अचानक ग्रीलमध्ये अडकली. ती मान अशी फसली की, त्या पोपटाला किंवा कोकीळ यांना काढता येत नव्हती. घाबरलेल्या पोपटाला सोडवण्यासाठी कोकीळ यांनी याबाबतची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी धाव घेत, पोपटाला सुखरूप बाहेर काढले. मात्र, त्या पोपटाच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्या पोपटाला ठाण्यातील ब्रह्मांड येथील एसपीसीए या पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या संस्थेत भरती केले आहे. उपचाराअंती त्याला वनविभागामार्फत जंगलात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
----------------