पाली - सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या ठाण्यातील विटाव्यात राहणारी सुश्मिता देशमुखने १७ जून रोजी केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुश्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे, सुश्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पाच सुवर्ण पदकासह ३२ पदकांची कमाई केली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आयटी क्षेत्रात मुलींचा दबदबा वाढताना दिसत आहे. क्रीडाक्षेत्रातही मुलीच आघाडीवर आहेत. पॉवरलिफ्टिंगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटाव्यातील एका सामान्य कुटुंबात राहणारी सुश्मिता सुनील देशमुख ही आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वोेत्तम कामगिरी करीत आहे. तिला विटाव्यातील मराठा समाज संघाच्या कार्यकर्त्यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला आहे. वाघोशी गावातील रहिवासी सेवा संघ, ठाणे, मुंबई, पुणे यांनीदेखील तिला उज्ज्वल यशासाठी शुुभेच्छा दिल्या.
सुधागडच्या सुश्मिता देशमुखला रौप्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 3:19 AM