- रवींद्र सोनावळे शेणवा : शहापूर तालुक्यातील शेणवे आश्रमशाळेतील अंजली पारधी या दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या घटनेची पोलिसांना माहिती न देता, परस्पर दफनविधी केल्याने संशय व्यक्त होत आहे.वासिंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेणवे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली सोळावर्षीय आदिवासी विद्यार्थिनी अंजली गुरु नाथ पारधी ही गणेशोत्सवाच्या सुटीसाठी तालुक्यातील रास येथे आपल्या गावी घरी गेली होती. दरम्यान, अंजलीने ११ सप्टेंबर रोजी राहत्या घरात दुपारी दीड वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजलीचे वडील गुरु नाथ सखाराम पारधी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना न देता अंजलीच्या पार्थिवावर परस्पर दफनविधी केला. हा संशयास्पद प्रकार असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी रास येथील बाळू मंगल बरोरा यांनी वासिंद पोलिसांकडे केली. त्यानुसार, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, सुटी संपल्यानंतरही अंजली आश्रमशाळेत परत न आल्याने शाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका व शिक्षकांनी तिचे रास येथील घर गाठले. अंजलीबाबत चौकशी केली असता, तिचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. ही घटना गंभीर असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ माहिती दिली. त्यानुसार, प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी विद्यार्थी आपत्कालीन मृत्यू चौकशी समितीला याबाबत कळवले आहे. वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करत आहेत. अंजलीने गळफास का घेतला, तिचा परस्पर दफनविधी का केला, या प्रश्नांचा शोध ते घेत आहेत.>अंजलीच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला असून, याप्रकरणी विविध मुद्यांवर चौकशी सुरू आहे.- राजा वंजारी, पोलीस निरीक्षक, वासिंद पोलीस ठाणे
शहापुरात आदिवासी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:19 AM