कल्याण, दि. 17 - कल्याण-बाजारपेठ पोलिसांनी एका संशयास्पद मोबाईल चोरटय़ाला पकडून पोलिस चौकीत आणले असता त्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली. आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करुन जखमी केल्याच्या प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी चोरटय़ाला अटक केली आहे. त्याचे नाव लतिफ जमील शेख (32) असे आहे. वल्लीपीर चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याची पोलिस चौकी आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकरटीकरण शाखेला माहिती मिळाली होती की, या परिसरात एक मोबाईल चोरटा येणार आहे. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी रात्री 9 वाजताच्या सुमारास वल्लीपीर चौकातील नॉर्थ इंडिया ेबेकरीजवळ लतिफ शेख हा 32 वर्षाचा तरुण संशयास्पद फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडून पोलिस चौकीत आणले. चौकीत त्याची विचारपूस सुरु केली. चौकशी सुरु करताच लतिफने चौकीच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला सहाय्यक पोलिस निरिक्षक सूर्यकांत पवार यांनी तसे करण्यापासून रोखण्याचा मज्जाव केला असता लतिफने फोडलेल्या काचेने पवार यांच्या मानेवर प्रहार करुन त्यांना जखमी केले. तसेच स्वत:च्याही मानेवर काचेने मारुन स्व:तला जखमी करुन घेतले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पवार यांनी लतिफला अटक करुन त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संशयास्पद चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सहाय्यक पोलिस निरिक्षकालाही केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 5:47 PM