ठाणे : वधूवर सूचक संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या ठाण्यातील एका महिलेस साडे तीन लाखांना गंडवणाºया एका नायजेरियन आरोपीस ठाणे पोलिसांनी हरियाणातून अटक केली. तो आणखी तिघींना फसवण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया एका महिलेने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वत:च्या नावाची नोंदणी केली होती. या माहितीच्या आधारे एका नायजेरियन युवकाने तो भारतीय असल्याची बतावणी करून महिलेशी व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने संपर्क साधला. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे घेतले. एकदा त्याने आपण दिल्ली विमानतळावर असून आपल्याजवळील ४० हजार अमेरिकन डॉलर्स भारतीय चलनात बदलण्यासाठी टॅक्स भरण्याकरिता ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. महिलेने विश्वास ठेवून त्याच्या खात्यात रक्कम जमा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने यासंदर्भात कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर करून शादी डॉट कॉम आणि मोबाइल कंपन्यांकडून आवश्यक तांत्रिक तपशील गोळा केला. त्यावरून आरोपी अर्नेस्ट उसनोबून हा हरियाणातील गुडगाव येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस या पत्त्यावर गेले असता, तिथे तो रहात नसल्याचे कळले. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा त्याच शहरातील नवीन पत्ता शोधून त्याला अटक केली.पोलीस कोठडीत रवानगीआरोपीजवळ नायजेरियासह दक्षिण आफ्रिका आणि लेसिथोप या देशांचेही पासपोर्ट आढळले. होंडा सिव्हिकसारखी महागडी कार तो वापरत असून ती जप्त केल्याचे सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले. आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
महिलेस लुबाडणारा नायजेरियन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 5:47 AM