डोंबिवली : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एक वॉर्डबॉय कक्षाच्या बाहेर, तर नर्स आतमध्ये शनिवारी गाढ झोपेत असताना रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांना उठविले असता वॉर्डबॉयकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी सखोल चौकशीअंती कारवाई करू, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, याची शहानिशा करून संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
------------------------------------
मोबाईल लंपास
कल्याण : रोहन तुळकुळे हे गणेश चतुर्थीनिमित्त शुक्रवारी मित्राकडे गणेश दर्शनासाठी जात होते. तेथून रात्री साडेदहाच्या सुमारास परतत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा चोरट्यांपैकी एकाने रोहन यांच्या हातातील मोबाईल खेचून पलायन केले. ही घटना रामबाग लेन नं. ४ मधील चिंतामणी हॉलसमोर घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
दुचाकी चोरी
कल्याण : नवनाथ सानप यांनी त्यांची दुचाकी २ जुलैला एपीएमसी मार्केटसमोरील परिसरातील रोडवर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी सानप यांनी शुक्रवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------
जाब विचारला म्हणून मारहाण
डोंबिवली : बहिणीला नणंदांनी का मारले, याचा जाब भाऊजीला विचारणाऱ्या भावाला तिघांनी मारहाण केल्याची घटना हेदुटणे येथे शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. यात आकाश भालेराव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात मंगेश जाधव, मयूरी आणि मेघा अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------
घरफोडीत हजाराेंचे दागिने लंपास
डोंबिवली : अमूल्य शेट्टे हे राहत असलेल्या पश्चिमेकडील साई लीला अपार्टमेंटमधील घराचे बंद कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------