ठाणे : एका महिला शिपायाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ठाणे पोलीस मुख्यालयाचे निलंबित साहाय्यक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.शहर पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी ६ सप्टेंबर २०१७ रोजी कळवा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी कळवा पोलिसांनी निपुंगे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (भादंवि कलम ३०६) गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर निपुंगे बरेच दिवस गैरहजर होते. वरिष्ठांकडे त्यांनी आजारी रजेचा अर्ज दिला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या काळात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. २२ सप्टेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तरीही निपुंगे यांनी भूमिगत होऊन आॅक्टोबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. १६ आॅक्टोबर २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर कायमस्वरूपी जामिनासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, सरकारी पक्षाने त्यासाठी विरोध केला. ६ सप्टेंबर रोजी पोलीस शिपाई सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली होती. जुलै २०१७ पासून निपुंगे तिचा मानसिक छळ करत होते, असा आरोप तिच्या भावाने केला होता. याशिवाय, सीडीआरच्या आधारे निपुंगे यांनी सुभद्रा पवार यांना जवळपास १११ कॉल्स केल्याचे उघडकीस आले होते. घटनेच्या दिवशीही त्यांनी बरेच कॉल्स केले होते, हे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना कायमस्वरूपी जामीन मंजूर केला नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून निपुंगे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. इथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. पोलिसांनी आत्महत्या प्रकरणामध्ये सुभद्रा पवार यांचा भावी पती अमोल फापाळे यांना २७ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यांचे व सुभद्रा पवार यांचे व्यक्तिगत वाद होते. यातूनच सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटकदेखील केल्याने आपणास कायमस्वरूपी जामीन मिळावा, असा युक्तिवाद निपुंगे यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, पोलिसांसमोर शरणागती पत्करून चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार, शुक्रवारी निपुंगे यांनी कळवा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
निलंबित साहाय्यक पोलीस आयुक्त निपुंगे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:40 AM