ठाणे, दि. ३ - आपल्या सहप्राध्यापिकेचा वारंवार अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या घोडबंदर रोड येथील एका महाविद्यालयातील विलास शिंदे या प्राचार्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला महाविद्यालयाने निलंबित केले असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आनंदनगर भागातील ‘होरायझन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट’ या वरिष्ठ महाविद्यालयातील ३५ वर्षीय प्राध्यापिकेशी शिंदे हा वारंवार गैरवर्तन करत होता. या प्राध्यापिकेला तो महाविद्यालयातील दालनात पाचारण करून आक्षेपार्ह मेसेज पाठवत होता. तसेच कामाच्या बहाण्याने मुंबई विद्यापीठ तसेच इतर ठिकाणी सोबत नेऊन त्यांच्याशी गैरवर्तन करत होता. अपशब्द वापरून त्यांच्या वैयक्तिक जी-मेलमधून डेटा वाचून त्यातील काही डेटा नष्ट करून या प्राध्यापिकेचे वैयक्तिक संदेश आणि फोटोची मॅनेजमेंटला त्याने माहिती दिली. जुलै २०१६ ते १२ मे २०१७ या कालावधीत त्याने त्यांच्याशी हे गैरप्रकार केल्याचे त्यांनी २ आॅगस्ट रोजी केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, महाविद्यालयाने त्याच्यावर कारवाई केली असून तो बाहेरगावी आहे. त्याची चौकशी करून त्याला अटक केली जाणार असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम. ढोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सहप्राध्यापिकेचा विनयभंग करणारा प्राचार्य निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 8:32 PM