अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या हजेरी शेडला अचानक भेट देऊन नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी शेडचा गोंधळ उघड केला आहे. तसेच जे कर्मचारी कायमच गैरहजर आहेत, त्या १२ कर्मचाऱ्यांवर लागलीच निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे सफाई कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेतील अनेक सफाई कर्मचारी हे कामावर नसतानाही त्यांची हजेरी नियमित लागते. तसेच अनेक कर्मचारी हे नियमित गैरहजर असतांनाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. अंबरनाथ पालिकेत ५७४ सफाई कर्मचारी असून त्यातील बहुसंख्य कर्मचारी हे हजेरी लावून दुसरीकडे कामावर जातात. तर, काही कामगार कामावर असताना रिक्षा चालविणे आणि भाजी विक्री करणे, अशी कामे करत असतात. त्यामुळे प्रभागात साफसफाईचे काम नियमित होत नाही. कर्मचाऱ्यांच्या या कामचुकारपणाला संबंधित विभागाचे अधिकारीदेखील साथ देतात. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील संगनमतामुळे कर्मचारी प्रभागात काम न करता खाजगी कामे करतात. सफाई कर्मचाऱ्यांच्या या गैरवर्तनाची माहिती मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना मिळताच त्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील सर्व हजेरी शेडची चाचपणी केली. त्यात त्यांना ९६ कर्मचारी हे गैरहजर असल्याचे आणि १२ कर्मचारी हे कामावर येतच नसल्याचे निदर्शनास आले. मुख्याधिकाऱ्यांनी या १२ कर्मचाऱ्यांना लागलीच निलंबित केले. तर, ९६ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापून त्यांना नोटीस बजावली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची तब्येत ठीक नाही, अशा कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयातील दाखला आणण्याचे आदेश काढले आहेत.
एकाच दिवशी १२ सफाई कर्मचारी निलंबित, मुख्याधिकाऱ्यांची कारवाई
By admin | Published: October 19, 2015 1:00 AM