कल्याण : कल्याण खाडीतून रेतीउपसा करणाऱ्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी धडक कारवाई केली होती. त्यात रेती व साधनसामग्री अशी ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली. साधनसाम्रगी नष्ट केल्याने रेती व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सुनावणी करताना न्यायालयाने रेती व्यावसायिकांविरोधातील कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच कल्याणच्या तहसीलदारांना आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.कल्याण रेतीबंदरामध्ये रेती व्यावसायिकांकडून बेकायदा रेतीउपसा केला जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वत: दिवसरात्र उभे राहून कारवाई केली होती. या वेळी रेती, रेती व्यावसायिकांचे सक्शन पंप, रेती काढणारे ड्रेझर जप्त केले. या कारवाईनंतर दंडात्मक रक्कम आकारून ते साहित्य संबंधितांच्या ताब्यात देण्याऐवजी ते स्क्रॅप केले. तसेच त्याचे तुकडे आणि रेतीही पुन्हा खाडीतच टाकली. या पाच तासांच्या शॉर्ट पिरीअड नोटिशीच्या कारवाईविरोधात रेती व्यावसायिक युनायटेड कंपनी आणि अशफाक डोण, सलीम खोत यांनी मिळून उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने रेती व्यावसायिकांच्या विरोधातील महसूल विभागाच्या कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती आदेश दिले आहेत. रेती व्यावसायिकांनी लिलावात एक कोटी ९५ लाख रुपयांची रेती घेतली होती. ती देखील कारवाईच्या वेळी खाडीत फेकून दिली. हे नुकसान कोणाचे झाले, रेती लिलावातून होणारा सरकारी महसूल बुडाला आहे की नाही, असा सवालही न्यायालयाने केला आहे. तसेच या कारवाईमुळे रेती व्यावसायातील पाच हजार कामगारांचा रोजगार ठप्प झाला आहे. (प्रतिनिधी)उशिरापर्यंत कधी काम केले?इतक्या अल्प कालावधीत दिलेल्या नोटीसवरून प्रत्यक्ष धडक कारवाई सुरू केल्याने तहसीलदारांनी नागरिकांच्या कामासाठी तहसील कार्यालयात रात्री १० वाजेपर्यंत बसून किती वेळा व किती दिवस काम केले आहे, असा जाब न्यायालयाने विचारला आहे. तहसीलदारांनी तीन वर्षांत काय काम केले, हे प्रतिज्ञापत्राद्वारे आठ दिवसांच्या आत सादर करावे, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
कल्याण रेतीबंदरवरील कारवाईस स्थगिती
By admin | Published: April 15, 2017 3:21 AM