डोंबिवली : भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सगळ्या आमदारांना निलंबित केले तरी भाजप आवाज उठवत राहणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो, असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले. आघाडी सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी पक्षाने कल्याण तहसीलदार कार्यालयावर निदर्शने केली.
महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. राज्यांमध्ये कोविड बळी जात आहेत, एमपीएससीमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, या सरकारला कुठलेही काम योग्य प्रकारे जमत नाही. सर्वसामान्य नागरिक महागाईने भरडला गेला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी राज्य सरकारने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले. जेणेकरून त्यांचा अपयश झाकले जावे, परंतु नागरिकांना माहीत आहे की नेतृत्वाशिवाय सरकार चालत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मत जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले.
कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयावर आंदोलन पार पडले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात पवार, कांबळे, रेखा चौधरी, मिहीर देसाई, प्रेमनाथ म्हात्रे, नाना सूर्यवंशी, अर्जुन म्हात्रे, अभिजित करंजुले, मितेश पेणकर, नगरसेवक मंदार टावरे, विशू पेडणेकर, विश्वजीत पवार, संजय विचारे, दिनेश दुबे, राजू शेख, संदीप शर्मा, विलास खंदिझोड, अमोल तायडे, पूनम पाटील आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थितीत होते.
------------------