मुंबई : ठाण्यातील घोडबंदर तर पुण्यातील बाणेर, बालेवाडी येथे पुरेशा पाण्याअभावी नव्या बांधकामांना दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने आणखी दोन आठवडे वाढविली. महापालिकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास मुदत मागितली आहे.ठाण्याच्या घोडबंदर तर पुण्याच्या बाणेर व बालेवाडी परिसरातील रहिवाशांसाठी ठाणे व पुणे महापालिका पुरेसे पाणी उपलब्ध करत नसल्याने, ठाण्याचे मंगेश शेलार व पुण्याचे अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने नव्या बांधकामांना दिलेली स्थगिती आणखी दोन आठवडे वाढविली.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ठाणे व पुणे महापालिकेला गेल्या पाच वर्षांत किती नव्या बांधकामांना परवानगी दिली? किती फ्लॅटधारक आहेत? त्यांना कशा पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येतो? पुढील १० वर्षांत उभारण्यात येणाºया नव्या बांधकांमांतील रहिवाशांसाठी पाण्याची काय व्यवस्था आहे? याबद्दल संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दोन्ही महापालिकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली. शुक्रवारच्या सुनावणीत ठाणे व पुणे महापालिकेच्या वकिलांनी संबंधित परिसरातील नव्या बांधकामांना दिलेली स्थगिती हटविण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
नव्या बांधकामांवर स्थगिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:30 AM