भिवंडी - प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेत बाळाराम जाधव (वय २५, रा. पाच्छापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
पाच्छापूर येथील अनिकेतचे नात्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. त्यातून ते दोघे पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वासिंद पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान दोघे दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक मुलीच्या मावस भावाला सोबत घेऊन गेले. दोघांना ताब्यात घेऊन दिल्ली येथून राजधानी एक्स्प्रेसने कल्याणकडे येताना मध्य प्रदेशमधील मुरौना या भागात गाडी आली असता तेथे अनिकेतने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाच्या खिडकीतून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांनी दिली.
मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अनिकेत दोन महिन्यांपासून घराबाहेर असताना मुलीचे कुटुंबीय व मावसभाऊ सुमित नागवंशी वेळोवेळी येऊन अनिकेतला संपवून टाकू, अशी धमकी देत होते. मुलीचा मावसभाऊ हा वासिंद पोलिसांसोबत दिल्ली येथे गेला होता. पोलिस बंदोबस्त असताना अनिकेतने शौचालयाच्या खिडकीतून उडी मारलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेतच्या कुटुंबीयांनी ठाणे पोलिस अधीक्षक व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करून न्याय मागितला आहे.
न्याय मिळवून देणारअनिकेतचा मृत्यू हा संशयास्पद आहे. पोलिस बंदोबस्त असताना अनिकेतने रेल्वे गाडीच्या शौचालयातून उडी मारून आत्महत्या केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत अनिकेतला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ॲड. किरण चन्ने यांनी दिली आहे.