भिवंडी - शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे काल रात्री एक फोन आल्यानंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत, अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला. त्यांचा खून करून पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश निमसे हे विकासकाचा व्यवसाय करीत होते ते शहापूर येथील अघई गावात रहात होते. काल रात्री त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर त्यांनी घरी काही न सांगता ते घराबाहेर पडले.आज शुक्रवार रोजी सकाळी भिवंडी तालूक्यातील दिघाशी गावालगत देवचुळे येथे त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला.गणेशपूरी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्या मृतदेहाची निमसे कुटूंबीयांकडून खात्री करून घेतली.त्या नंतर मृतदेह भिवंडीत इंदिरागांधी स्मृती उप जिल्हा रूग्णालयांत आणला़. परंतु मृत्युचे कारण समजू शकले नाही.त्यामुळे त्यांचा मृतदेह मुंबईतील जे.जे.रूग्णालयात पाठविला. दरम्यान शैलेश निमसे यांच्या हत्येने शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 4:26 PM