कल्याण : कोपर-दिवा रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रूळांलगत साहिल हाश्मी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद असून, या घटनेचा तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करीत आहेत.
उत्तर प्रदेशातील भदोई येथे राहणारा साहिल हा एका अल्पवयीन तरुणीसोबत १८ जूनला मेल एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघाला. १९ जूनला ही गाडी कल्याणला पोहोचली. सकाळी ११ च्या सुमारास सीएसटी लोकलच्या मोटरमनला कोपर-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान एक तरुण जखमी अवस्थेत रूळांलगत पडलेला दिसला. मोटारमनने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना कळविली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी अवस्थेतील साहिलला मुंबईच्या शिव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, साहिलसोबत मुंबईला आलेली अल्पवयीन तरुणी तिच्या भावासोबत तिच्या मूळ गावी परतली आहे. साहिल व अल्पवयीन तरुणी मुंबईला येत असल्याची माहिती तिच्या मुंबईत राहणाऱ्या भावाला मिळाली होती, तसेच त्याने साहिल व आपल्या बहिणीला ट्रेनमध्ये पाहिले होते. तिच्या भावाच्या मते साहिलने चालत्या गाडीतून कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान उडी मारली होती. दुसरीकडे साहिलच्या विरोधात उत्तर प्रदेशात त्याने अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशात दाखल असलेला गुन्हा आणि तरुणीच्या भावाने केलेले विधान पाहता साहिलने चालत्या गाडीतून उडी घेतली की त्याला कोणी तरी ढकलून दिले, याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
------------------