लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळे फिरवून शहरात घडणाऱ्या सोनसाखळी, विनयभंग, अपघात अशा घटनांवर आळा बसविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. परंतु, यापुढेही जाऊन शहरात किमान चार दिशांना बलूनद्वारे म्हणजेच्या फुग्याच्या माध्यमातून कॅमेरे हवेत सोडून त्याद्वारे आकाशातून ठाण्यातील घटनांवर नजर ठेवण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे. शहरात सोनसाखळी आणि अपघातांचे प्रमाण हे आजही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे या घटनांना आळा बसावा म्हणून संपूर्ण शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. परंतु, अशा प्रकारे हा खर्च पालिकेला परवडणारा नसल्याने मागील वर्षी नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीतून प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी, प्रत्येकी पाच - पाच लाखांची तरतूद केली होती. सुरुवातीला काही नगरसेवकांनी याला विरोध केला. परंतु, त्यानंतर त्यांचा विरोध मावळला होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे कॅमेरे बसविण्यात न आल्याने हा निधी वाया गेला होता. परंतु, आता पुन्हा एकदा कॅमेरे बसविण्याच्या कामाला वेग आला असून यावेळी नियमित कॅमेराबरोबरच काही खास जबाबदारी निश्चिती करणारे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखाद्या चौकात कचरा कुंडीतील कचरा ८० टक्क्या पेक्षा जास्त भरल्यानंतरही येथील तो उचलला जात नसल्यास त्याची माहिती संबधित विभागाकडे पोहचविण्याची तजवीज त्यामध्ये केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या चौकात एखादी संशयास्पद व्यक्ती वारंवार फिरत असल्यास त्याचीही नोंद घेतली जाणार आहे. एखादी बेवारस वस्तु काही सेकंदापेक्षा जास्त काळ रस्त्यावर राहिल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचवली जाणार आहे. यासाठी सुरुवातीच्या काळात सुमारे दहा तंत्रज्ज्ञाची मदत महापालिकेकडून घेतली जाणार आहे. तसेच पोलिसांच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. परदेशात ज्याप्रमाणे एखादे संशयास्पद वाहन कोणत्या रस्त्यावरुन नेमके जात आहे याची माहिती होण्यासाठी उंचावर कॅमेरे बसविले जातात. त्याच धर्तीवर ठाण्यातही बलूनद्वारे कॅमेरा हवेत सोडून शहरावर नजर ठेवली जाणार आहे.
बलून कॅमेरे टिपणार संशयास्पद हालचाली
By admin | Published: June 27, 2017 3:11 AM