लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : दंडापासून दोन्ही हात नसूनही १२ वीच्या परीक्षेत ६८.७७ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेल्या पालघर जिल्ह्यातील बेटेगावजवळील कल्लाळे येथील कल्पेश विलास दौडा या विद्यार्थ्याच्या घरी पालघरचे जिल्हाधिकारीडॉ. कैलास शिंदे हे स्वत: गेले आणि त्यांनी त्याचे कौतुक केले. या वेळी कल्पेश याला २० हजार रुपयांचा धनादेश तसेच शैक्षणिक साहित्यही भेट देण्यात आले.आजच्या विद्यार्थ्यांना भरघोस गुण सहज मिळतात, परंतु कल्पेश हा दोन्ही हातांनी दिव्यांग असून त्याला दंडापासून दोन्ही हात नाहीत. अशा परिस्थितीत त्याने ६८.७७ टक्के गुण मिळवून प्रचंड इच्छाशक्ती व दृढविश्वासाने शारीरिक अडचणींवर मात करत आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श उभा केला आहे. या होतकरू विद्यार्थ्याचे यश पाहता सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.आश्रमशाळा बेटेगाव येथून इ. १० वी च्या बोर्ड परीक्षेत त्याने ७५ टक्के गुण मिळवले होते, तर स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालयात लालोंडे येथील कनिष्ठ महाविद्यालयात इ. ११ वी व १२ वीमध्ये कला शाखेतून त्याने शिक्षण घेतले. तसेच या दोन्ही वर्षांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकवर्ग व सर्व कर्मचारी यांनीही विशेष सहकार्य केल्याचे कल्पेश आवर्जून सांगतो. दरम्यान, राज्यशास्त्र विषयात बी.ए. करून एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न त्याने बाळगले आहे.
दंडापासून दोन्ही हात नसूनही १२ वीच्या परीक्षेत सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 1:09 AM