ठाणे : स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुण्यस्मरण दिनाचे रूपांतर नित्य स्मरणात झाले, तरच सावरकरांचे विचार मनामनांत पोहोचतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वा. सावरकरांच्या ५५ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून व्यास क्रिएशन्सच्या सावरकर विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी योजलेल्या आगामी योजनांची यावेळी घोषणा करण्यात आली.
स्वा. सावरकर साहित्य शृंखला उपक्रम, चैत्रपालवी सावरकर परिवार विशेषांक, सत्पात्री पृष्ठदान योजना, सावरकरप्रेमींना सावरकरांच्या साहित्यातील राष्ट्रभक्ती जागवणारे संवाद, उतारे, प्रतिभासंपन्न कवने व्हॉट्सॲपद्वारे लाखो सावरकरप्रेमींपर्यंत पोहोचवणारा अभिनव उपक्रम सुरू केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. स्वा. सावरकर यांचे समग्र साहित्य, व्यास क्रिएशन्स प्रकाशित साहित्य, इतर प्रकाशकांनी प्रकाशित केलेली सावरकर विचारांची पुस्तके, नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके एकाचवेळी वाचकांना स्वा. सावरकर साहित्य शृंखला उपक्रमांतर्गत उपलब्ध होणार आहे. सावरकर परिवार, त्यांच्या क्रांतीकार्यात सहभागी झालेले सहकारी, सावरकरप्रेमी विविध क्षेत्रांतील घराणी, सावरकर वैचारिक परिवार यावर प्रकाश टाकणारा चैत्रपालवी सावरकर परिवार विशेषांक, व्हाॅट्सॲप संदेश उपक्रम यांना सावरकरप्रेमी उत्तम प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----------