ठाणे : ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी तीन आणि शहरी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी एक अशा ८ शाळांनी पहिल्या तीनमध्ये क्र मांक मिळवला आहे. पहिल्या तीन क्रमांकांत निवड झालेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील शाळांचा मुख्यत्वे समावेश आहे. त्या सर्व शाळांची नावे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे.राज्य शासनाने आॅनलाइन पद्धतीने या पुरस्कारासाठी अर्ज भरून घेतले होते. जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकांच्या एकूण ४११ शाळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४८ शाळांची निवड झाली आहे. शाळेचा परिसर स्वच्छ असणे, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध असणे, शाळेतील स्वच्छतागृहांची योग्य निगा राखली जाणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था असणे, शाळेच्या आवारात हात धुण्यासाठी साबण अथवा हॅण्डवॉश असणे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन असणे आदी बाबींची माहिती शाळांनी अर्जात नमूद केली होती.वरील निकषांवर जिल्हा परिषदेच्या सात शाळांसह नवी मुंबई महापालिकेतील एका प्राथमिक व एका माध्यमिक शाळांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवल्याने त्या शाळांची निवड ग्रीन गटात झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व जिल्हा समिती तयार केली होती.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक विभागाच्या जि.प. शाळा जांभूळवाडी हिने प्रथम, कातबाव द्वितीय क्र मांक आणि उसघरने तृतीय क्र मांक पटकावला.
‘स्वच्छ भारत’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ४८ शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:43 AM