- प्रसाद पाठक
आपल्यावर होणारी टीका ही आपल्याला संपवणारी नाही, तर आपल्यात नसलेल्या गुणाला ओळखून, ती भरून काढून, सर्वोच्च अढळ स्थानी झेप घेण्यासाठी सुसंधी आहे, हे ज्याला कळते तो यशाच्या शिखरावर निश्चयाने पोहोचू शकतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गानकोकिळालता मंगेशकर. संपूर्ण जगाच्या लाडक्या लतादीदी. २८ सप्टेंबर त्यांचा जन्मदिन. त्या ९२व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने स्वरसम्राज्ञीच्या गायनप्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप.कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीप कुमारने नकळतपणे का होईना पण ^^^‘मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बूं आती है...’ असे म्हटले नसते तर... आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर... तर आज लता मंगेशकर ज्या उंचीवर आहेत तेथे नसत्या. जिद्दी तर त्या होत्याच, हट्टी, ठामही होत्या. आजही तशाच आहेत. आपल्याला काय साध्य करायचे आहे त्या विचारावर त्यांचे लक्ष केंद्रित होते. प्रसंगी नाते, मैत्री, संबंधही त्यांनी आड येऊ दिले नाहीत. मग समोर प्रत्यक्ष त्यांची सख्खी बहीण असो, संगीतकार सचिनदा असो वा मोहम्मद रफी असो... किंवा निर्माता दिग्दर्शक राज कपूर! आपल्या भूमिकेत व विचारावर त्या ठाम राहिल्या. काही काळ अबोला सहन करूनही. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना आपल्या अंगी असलेल्या कलेला व्यावसायिक पातळीवर आणावे लागले; पण तसे आणतानाही सुरांशी, स्वरांशी, संगीतकलेशी तडजोड, प्रतारणा कधीच केली नाही. उलट आपण अपेक्षा करतो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिकच मिळाल्याचे समाधान त्यांनी संगीतकारांना दिले आणि पर्यायाने आनंदही रसिकांना दिला. अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या संगीत रचनांना लता मंगेशकर यांच्या स्वरांच्या परिसस्पर्शाने अजरामर केले आहे.
शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आणि चित्रपट संगीत कनिष्ठ असा विचार करणाऱ्या तसेच ‘लताचे शास्त्रीय संगीतातील योगदान काय,’ असा प्रश्न विचारणाºया लोकांनी लतादीदींची शास्त्रीय संगीतावर आधारित असंख्य गीते ऐकावीत. शास्त्रीय संगीत सामान्य माणसाच्या मनात रुजवण्यात लता स्वरांचे मोठेच योगदान आहे. केवळ एकच उदाहरण देतो. १९५७ साली आलेला सुवर्ण सुंदरी चित्रपट, संगीतकार पी. आदीनारायण राव, गाणे, ‘कुहू कुहू बोले कोयलिया...’ आजही हे गाणे सर्व गानरसिकांना प्रिय आहे आणि प्रत्येक ऋतूचे वर्णन करणारे असल्यामुळे तसेच शास्त्रीय संगीत रसिकांच्या आवडीच्या ‘सोहनी’ रागावर आधारित असल्याने सार्वकालिक सर्वप्रिय पुन्हा पुन्हा ऐकले जाणारे आहे.
शास्त्रीय राग आधारित रचना केवळ शास्त्रीय रचना आहेत किंवा बुजुर्ग संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत म्हणून गाजल्या नाहीत तर शास्त्रीय संगीताला केवळ तीन-चार मिनिटांच्या अतिशय कमी अवधीत तेवढ्याच ताकदीने त्या वेळच्या रेकॉर्डिंग पद्धतीनुसार (अत्याधुनिक रेकॉर्डिंग नाही) पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करून अतिशय उत्कट अशी साभिनय भावना त्यात प्रकट करून पार्श्वगायनात अढळपदी टिकून राहणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. चित्रपट क्षेत्र, मुख्यत्वे अमराठी लोकांचे स्थान अधिक बळकट असताना, तसेच चित्रपटसृष्टीतील संगीत गायन या संबंधित कोणत्याही लेखात जी मोजकी मराठी नावे समाविष्ट केल्यावाचून तो लेख इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही त्या नावांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव सर्वांत आघाडीवर असेल यात तिळमात्रही शंका नाही. लता मंगेशकर या मराठी व्यक्तीने, कलाकाराने, एका कर्तृत्ववान स्त्रीने जगाला नोंद घ्यावीच लागेल एवढे महान कार्य केले आहे.
(लेखक संगीतप्रेमी आणि जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.)