मीरा राेड : मीरा-भाईंदरमध्ये भरावमाफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोस सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ आणि ना-विकास क्षेत्रातही त्यांनी भराव केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलीस, राजकारणी आणि महसूल विभागाकडून याकडे हाेत असलेल्या डाेळेझाकीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचे रस्ते-पदपथ व विविध बांधकामे यातून माेठ्या प्रमाणात डेब्रिज निघते. मुंबईहूनही भरणीसाठी डम्पर येतात. कांदळवन, पाणथळ, सीआरझेड आणि ना-विकास क्षेत्र यांसारख्या संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेसह नगरसेवक, पोलीस, महसूल, वनविभाग आदींची आहे. मात्र, अशा ठिकाणी सातत्याने हाेणाऱ्या भरावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हाेऊन पावसाचे पाणी साठवून ठेवणारे नैसर्गिक पाणवठेही नष्ट हाेत आहेत.
महापालिकेने भराव रोखण्यासाठी पथके नेमून स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी आदींना जबाबदारी दिली आहे. मात्र, तरीही भरावाची समस्या कायम असून तक्रार येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. डेब्रिजची डाेळ्यांदेखत वाहतूक सुरू असतानाही पालिका जबाबदारी झटकताना दिसत आहे, असा नागरिकांचा आराेप आहे. कांदळवन समितीमध्ये पाेलिसांचाही समावेश असून कांदळवन संरक्षणाची त्यांचीही जबाबदारी असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
परिमंडळ १ मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. माती-दगड भरावाच्या कारवाईची जबाबदारी महसूल विभागावर आहे. तलाठी-मंडळ अधिकारी स्वतःहून गस्त घालून या माफियांना जरब बसविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. भरणी करून खाजगी जमीनमालक, विकासक आदींना भूखंड तयार करून दिले जातात. खाजगीच नाही, तर सरकारी जागेतही हा प्रकार सुरू आहे. भराव टाकण्यासाठी वरून पैसेही मिळतात.
शहरासाठी केवळ चार-पाच तलाठीच आहेत. तरीही तक्रारीनुसार कांदळवनात भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिसांना संयुक्त बैठक बोलावून कार्यवाहीची रूपरेषा ठरविण्यात येईल. - नंदकिशोर देशमुख, अपर तहसीलदार
महापालिका याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. भराव झालेल्याची माहिती तपासून त्यावर तत्काळ याेग्य कारवाई केली जाईल. वॉटर बॉडीज-कांदळवनातील भराव काढला जाईल. कांदळवन व वॉटरबॉडी शहरासाठी महत्त्वाच्या आहेत. - दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका