वज्रेश्वरी : ऊसतोडणी मजूर तोडणीसाठी सतत स्थलांतरित होत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून या मुलांसाठी साखरशाळा हा उपक्रम राज्य सरकारकडून राबविण्यात येतो, परंतु पुण्याच्या दोन मुलींनी चक्क पडघा गावाजवळील आपल्या शेतावरच या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सरकारती मदत न घेता, साखरशाळा हा उपक्रम राबवत आहे.पुण्याच्या अश्विनी आणि रणजीत दरेकर यांची पडघा येथे शेती आहे. ते गेली चार वर्षे या शेतातील १४ एकर जमिनीवर यशस्वी उसाचे उत्पादन घेत आहेत. या वर्षीही त्यांनी ऊस लागवड केली आणि ते तोडण्यासाठी त्यांनी मालेगावहून मजूर आणले होते. या मजुरांसोबत त्यांची २२ ते २५ मुलेही आली होती. लॉकडाऊनमुळे सतत घरी असल्याने, त्यांनी यावेळी आपली ११ वर्षांची मुलगी दिविजा हिला सोबत आणले होते. दिविजा रोज या मुलांसोबत खेळत असत. त्यावेळी ती त्यांना गोष्टी, गाणी म्हणून दाखवत असत. तेव्हा तिला वाटले की, आपण यांना आपल्याला शाळेत जे शिकवितात, ते थोडं-फार शिकवू शकतो. तिने आपली मैत्रीण सेजल पवार हिलाही आपल्या शेतावर बोलवून घेतले आणि सुरुवात झाली साखरशाळा उपक्रमास.या दोघीही ३ ते १३ वर्षीय मुलांना रोज सकाळी लवकर उठवून प्रार्थना, त्यानंतर योगासने, सूर्यनमस्कार करण्यास शिकविले. त्यांच्याबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळू लागल्या. त्यामुळे सुरुवातीला लाजणारी ही मुले त्यांच्यात एकरूप होऊन गेली. तेव्हा त्यांना मराठी, इंग्रजी अक्षर, अंकओळख, चित्रकला, वेगवेगळे साहित्य वापरून कागदावर चित्र बनविणे, दगडावर रंगांच्या मदतीने चित्र काढणे, कागदी वस्तू बनविणे असे शिक्षण देऊ लागल्या. याशिवाय त्यांनी या मुलांना आहार, स्वच्छता, आरोग्य शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले. सतत १५ दिवस या मुलांना त्यांनी रोज शिक्षण दिले. दिविजा आणि सेजल घेत असलेल्या साखरशाळेची माहिती मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांना समजल्यावर, त्यांनी या दोघींचे कौतुक करून भिवंडीतील आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून या सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली. या ऊसतोडणी मजुरांना बालविवाह, आरोग्य आणि शिक्षण याबद्दल माहिती दिली. तर या दोघींमध्ये मला १५ दिवसांत खूप बदल जाणवला. त्यांना या प्रक्रियेतून जाताना खूप आनंद देणारे होते. त्या मुलांबद्दलची भावना, जाणीव यामुळे या दोघींच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि हे भविष्यात त्यांना खूप पुढे घेऊन जाईल. - अश्विनी दरेकर, दिविजाची आई
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या आयुष्यात आला गोडवा, दोन मुलींकडून साखरशाळा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:27 AM