ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणा-यांची संख्याही आतापर्यंत ५० च्या घरात गेली आहे. आता स्वाइनच्या रुग्णांमध्ये प्रचंड घट होताना अजून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या लसीचा पत्ताच नाही. परंतु, त्याची आॅर्डर दिली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ठामपा आरोग्य विभागाने लस उपलब्ध असल्याचा दावा केला.ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा असून त्यामध्ये सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच दोन नगरपंचायतींचा समावेश आहे. १ जानेवारी ते ४ आॅक्टोबरदरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ९७८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील अजून १०१ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. जिल्ह्यात ४६ आणि जिल्ह्याबाहेर तिघे असे ४९ जण दगावले आहेत. त्यात सर्वाधिक ३१ रुग्ण ठामपाच्या कार्यक्षेत्रात दगावले आहेत. जुलै महिन्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलवली. तेव्हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना जनजागृती आणि लसखरेदी करण्याचे आदेश दिले.
स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव - स्वाइनचे रुग्ण घटले, पण लस उपलब्ध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:45 AM