लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वाइन फ्लूचा धसका जिल्ह्यातील नागरिकानी घेतला असून साधा जरी फ्लू झाला तरी, त्यांच्याकडून स्वाइन फ्लूची तपासणी केली जात आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूसंदर्भात तपासणी करणाऱ्यांचा आकडा एक लाख ६ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामध्ये २४२ जणांना स्वाइन फ्लू झाला आहे. तर, मागील तीन दिवसात जिल्ह्यात स्वाइनच्या ३१ रुग्णांची अतिरिक्त वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहा महापालिक ांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा एकूण स्वाइन फ्लू संदर्भात ९ विशेष कक्ष स्थापन केले आहेत. तसेच १२७ स्क्रीनिंग सेंटर आहेत. तेथे १ जानेवारीपासून आतापर्यंत १ लाख ५ हजार ४३२ जणांनी फ्लू संदर्भात तपासणी केली आहे. त्यापैकी २८२ जणांना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता वर्तविल्याने संशयित म्हणून ते पुढे आले होते. त्यातील आतापर्यंत २४२ जणांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लागण झालेल्या २४२ पैकी १३ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर, १४८ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तसेच ८१ जण अजून उपचार घेत आहेत.आज पालकमंत्री घेणार स्वाइन फ्ल्यूचा आढावाठाणे : स्वाइनचा जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, आदी कामांचा व रूग्ण संख्येचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी ५ जुलैला दुपारी ४ वाजता विशेष बैठक आयोजित केली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. दिल्ली येथील आरोग्य पथकाने ठाणे जिल्ह्यातील स्वाइन बाबत गांभीर्याने आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यात झपाट्याने स्वाइनचा फैलाव होत असल्याचे या पथकाच्या निदर्शनात आले आहे. महापालिका, नगरपालिका, ग्रामीण आरोग्य यंत्रणा आदींच्या नियंत्रणातील स्वाइन फ्ल्यूच्या रूग्णांचा आढावा पालकमंत्री घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच सर्व महानगरपालिकां आणि नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी उपस्थित राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लाखोंनी तपासणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६९ हजार नवी मुंबईकरांनी तपासणी केली आहे.
जिल्ह्याला स्वाइनचा धसका
By admin | Published: July 05, 2017 6:25 AM