लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वातावरणातील बदलांमुळे ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यांत ५१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून चार जण दगावले आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लूशी संबंधित संशयित म्हणून जवळपास ८२ हजार ६३१ लोकांची तपासणी केली आहे. दगावलेले रुग्ण हे ठाणे आणि मीरा-भार्इंदर तसेच कल्याण महापालिकेच्या हद्दीतील आहेत. जिल्ह्यातील एकूण ५१ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक ४३ रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत सापडल्याची माहिती सरकारी आकडेवारीवरून पुढे आली. यातील बहुतांश रूग्ण खाजगी रूग्णालयातच उपचार घेत आहेत.सहा पालिकांच्या रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. १ जानेवारी ते १५ जूनदरम्यान या आजारासंदर्भात ८२ हजार ६३१ जणांची तपासणी झाली आहे. यात सर्वाधिक ६१ हजार ३७६ लोक नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील आहेत. त्यात दोन संशयित आढळले होते. मात्र, त्यातील एकालाही स्वाइनची लागण झाली नसल्याचे नंतर पुढे आले. कल्याणमध्ये ६४२ जणांची तपासणी झाली. त्यात ५ जणांना स्वाइनची लागण झाली असून एका महिलेचा नुकताच मृत्यू झाला.ठाणे पालिकेच्या हद्दीत ६ हजार ६२४ जणांची तपासणी झाली. त्यात ४३ जणांना लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात चार हजार ३४५ जणांची तपासणी झाली. उल्हासनगर मनपा हद्दीतही ६ हजार १५६ जणांची तपासणी केली. उल्हासनगर आणि ठाणे शासकीय रुग्णालयांत तपासणी केलेल्यांमध्ये एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. मीरा- भार्इंदरमध्ये तपासणी केलेल्या २,५७१ जणांपैकी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुढे तो रुग्णही दगावला. भिवंडीत ९१७ जणांची तपासणी केली. पण एकही संशयित आढळला नाही.ठाण्यात एका घोड्याला स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्याला इंजेक्शन देऊन ठार करण्यात आले आणि नागरिकांचा विरोध असतानाही मुंब्रा येथे पुरण्यात आल्याची घटना उघडकीस आली. स्वाइन फ्लूची लागण झालेले आतापर्यंत १७ रुग्ण हे ठाणे आणि कल्याण महापालिका हद्दीत उपचारार्थ दाखल आहे. त्यामध्ये १६ रुग्ण एकट्या ठाणे तर एकाच रुग्णावर कल्याण महापालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात स्वाइनचे रुग्ण वाढले
By admin | Published: June 16, 2017 1:57 AM