ठाणे : ठाण्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळविण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतदेह कच-याच्या पिशवीत बांधून दिले जात आहेत. रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या वॉररूमची यंत्रणादेखील कोलमडून गेली आहे. विशेष म्हणजे रुग्णाला रुग्णालयात बेड नसल्याचे सांगून त्याला घरीच ठेवा, मेडिसिन द्या, असे उत्तर महापालिकेच्या एका कर्मचा-याने दिले होते. त्या रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाण्यात रोजच्या रोज दीड हजारांहून अधिक नवे रुग्ण वाढत आहेत. त्यात मागील काही दिवसांत मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा आजही शहराला जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना चांगली सुविधा मिळावी, रुग्णवाहिका वेळेत मिळावी, बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कोविड वॉररूम सुरू केली आहे. परंतु, तिचे बहुतेक नंबर उचलले जात नसल्याचा वाईट अनुभव अनेक ठाणेकरांना येत आहे. त्यामुळे ही वॉररूम नेमकी कशासाठी सुरू केली, तिचा उद्देश काय, असे सवाल होऊ लागले आहेत. त्यातही एखाद्या वेळेस फोन उचलला गेला, तर बेड उपलब्ध नाही, रुग्णवाहिका नाही, अशी उडवाउडवीचीच उत्तरे दिली जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
चार दिवसांपूर्वी घोडबंदर भागातील एका रुग्णाला जास्तीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या नातेवाइकाने वॉररूमला फोन केला होता. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने प्रभाग समितीमधील ज्या कर्मचा-याकडे याची जबाबदारी दिली आहे, त्यांना संपर्क साधला, तर त्या कर्मचा-यानेदेखील उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याचे उत्तर त्याने दिले. तुम्ही रुग्णाला घरीच ठेवा. त्याला गोळ्या द्या. तो घरीच बरा होईल, असेही त्याने सांगितले. परंतु, रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्याला तत्काळ बेड उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करूनही त्याला बेड काही मिळाला नाही. अखेर, मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.
......
आम्ही तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या वॉररूमला कॉल केला होता. परंतु, तेथून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही प्रभाग समितीमधील संबंधित कर्मचा-याला फोन केला, तर त्याने रुग्णाला घरीच ठेवा, असे सांगितले. त्याला रुग्णाची प्रकृती खालावली असल्याचे सांगितल्यानंतरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मंगळवारी आमच्या नातेवाइकाची प्राणज्योत मालवली. यात पालिकेच्या त्या कर्मचा-याची चूक असून त्याच्यावर कारवाई व्हावी.
(सुरेश यादव, रुग्णाचे नातेवाईक)