रवींद्र सोनावळे
शेणवा : वादळीवाऱ्यात पत्र्यांचे छप्पर उडालेल्या मळेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. शहापूर तालुक्यातील मळेगाव ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत ७९९ लोकसंख्या असणाºयामळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या मंजूर ७० हजार रुपये खर्चाच्या निधीतून २००४-०५ मध्ये उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीची २०११-१२ मध्ये जनसुविधा योजनेंतर्गत एक लाख ९८ हजार ३६५ रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली आहे. वादळीवाºयामुळे उडालेलेस्मशानभूमीचे पत्र्यांचे छप्पर दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीने वेळेवर न केल्याने अखेर स्मशानभूमीला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
छप्पर उडालेल्या स्मशानभूमीत ऐन पावसात अंत्यविधी करायचे होते. पण, कसे करणार, या चिंतेत ग्रामस्थ होते. अखेर, ग्रामस्थांनी भर वादळी पावसात जीव मुठीत घेऊन स्मशानभूमीच्या छपरावर चढून ताडपत्री टाकून अंत्यविधी केले. ग्रामपंचायतीने तातडीने येथे छप्पर टाकावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पावसाळ्यात अंत्यविधीला त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे मागणी केली असून निधी उपलब्धझाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल. - कुरेशी वशिम, ग्रामसेवक