ठाणे : ठाणे शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या टीएमटी सेवेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. त्यामुळे ठाणेकरांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी टीएमटीच्या ताफ्यामध्ये अतिरिक्त १०० बसगाड्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि संघर्षच्या महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शमीम खान यांनी गुरुवारी नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती विलास जोशी आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
बससाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीए स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, आपण भेट घेतली असता राजीव यांनी या बसगाड्या चालविण्याबाबत अनुकूलताही दर्शविली होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील या मागणीचा गांभीर्याने विचार करून तसे पत्र एमएमआरडीएला दिले आहे. या मागणीची तत्काळ पूर्तता करावी, याकडे खान यांनी लक्ष वेधले आहे.
‘कळवा-मुंब्रा भागासाठी बस राखीव ठेवा’काही बसगाड्या कळवा-मुंब्रा भागासाठी राखीव ठेवण्यात याव्यात, मुंब्रा येथे टीएमटी डेपोसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तत्काळ आगाराचे काम सुरू करावे, भारत गिअर्स ते मुंबईदरम्यान टीएमटीची फेरी सुरू करावी, बसवाहक-चालकांकडून गैरवर्तणूक होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच थांब्यावरच बस थांबविण्यात यावी, आदी मागण्याही त्यांनी केल्या.