उल्हासनगरातील बोगस डॉक्टर व लॅबवर कारवाई करा, काँग्रेसची मागणी
By सदानंद नाईक | Published: September 24, 2022 06:14 PM2022-09-24T18:14:01+5:302022-09-24T18:15:19+5:30
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाकडून गेल्या ३ वर्षांपासून बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
उल्हासनगर : शहरात बोगस डॉक्टर व लॅबचा सुळसुळाट झाला असून सामान्य नागरिकांचे बळी जाण्यापूर्वी त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली आहे. महापालिका उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांना यासंदर्भात शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाकडून गेल्या ३ वर्षांपासून बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. दरवर्षी डॉक्टरांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडून बोगस डॉक्टरांवरील कारवाई ठप्प पडली. त्यामुळे शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा होत आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वैधकीय सेलचे प्रदेश समन्वयक डॉ धीरज पाटोळे व शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा प्रश्न उठविला असून महापालिका उपायुक्त (आरोग्य) सुभाष जाधव यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे.
शहरातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर तसेच अवैध लॅबवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याची महिती साळवे यांनी दिली. महापालिका आरोग्य विभागाने याबाबत कारवाई सुरू केली नाहीतर, काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेतच पण दहा वर्ष मेडिकलची प्रॅक्टिस करून रुग्णांना सेवा देणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरांवर देखील यामुळे अन्याय होत आहे. असे प्रदेश समन्वयक डॉ. धीरज पाटोळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष राज्यभर बोगस डॉक्टरां विरोधात मोहीम उघडली असून अनेक जण जेलची हवा खाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरारात चालणाऱ्या बोगस डॉक्टर व लॅब बाबत पक्षाच्या वैदकिय सेलला संपर्क साधण्याचे आवाहन देखील डॉ पाटोळे यांनी केले. महापालिका उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी बोगस डॉक्टर व लॅब विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.