ठाणे : डेल्टा प्लस कोरोना विषाणू महाभयंकर आहे, असे काही तज्ज्ञ सांगत आहेत. तिसरी लाट येणार असल्याने कडक निर्बंध लागू झालेले आहेत. मात्र, राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ना डेल्टा प्लसचे भय आहे, ना त्यांच्यावर निर्बंध मोडल्याबद्दल कारवाई केली जात आहे. शनिवारी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत केलेल्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. अनेकांच्या तोंडांवर मास्क नव्हते व असले तरी हनुवटीवर होते. या बेजबाबदार राजकीय मंडळींवर काय कारवाई करणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, उद्योजक विचारत आहेत.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपने चक्काजाम आंदोलन केले, तर या आरक्षण गमावण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याने मोदी सरकारचा निषेध करण्याकरिता काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दोन्ही पक्षांच्या आंदोलनात निर्बंध पाळले गेले नाहीत. सर्वसामान्यांनी लग्न समारंभात गर्दी केली, तर गुन्हे दाखल केले जातात. दुकानदाराने वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवले तर दंड केला जातो. सर्वसामान्यांच्या तोंडावर मास्क नसेल तर दंड केला जातो. फिरायला बाहेर पडणाऱ्यांना ऊठबशा काढायला लावतात. मात्र, विरोधी पक्षनेते, भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना कोरोना नियम उल्लंघन केल्याबद्दल कुठलाही दंड का केला जात नाही, असा संतापजनक प्रश्न सामान्य करीत आहेत. काँग्रेस सत्ताधारी महाविकास आघाडीत आहे. सरकारने लागू केलेले निर्बंध सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर बंधनकारक नाहीत का, असा संतप्त सवाल गृहिणी करीत आहेत.
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, लोकलमध्ये प्रवेशबंदी असल्याने बसगाड्यांमधून सर्व नियम पाळून आम्हाला त्रासदायक प्रवास करावा लागतो. मास्क खाली असला तर दंड भरावा लागतो. हे सर्व जाचक नियम केवळ आम्हा सामान्यांनाच आहेत का, असा सवाल विक्रम देशमाने यांनी केला. डोंबिवलीतील एक दुकानदार नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला की, कोरोनाचे नियम पाळले नाही तर आमच्याकडून दंड वसूल केला जातो. एकतर, आमचा धंदा बुडाला आहे. त्यात सर्व नियम आमच्या बोकांडी मारले आहेत. राजकीय नेत्यांना कसेही वागण्याची खुली सूट दिली आहे का? भाजप व काँग्रेसच्या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्या प्रत्येकाकडून दंड वसूल करा, अशी मागणी माधवी भडकमकर यांनी केली.
...........
वाचली