ठाणे : अनधिकृतपणे धंदा करणे, त्यातून पैसे मिळविणे, यातून अनधिकृत फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे केवळ एका फेरीवाल्यांवर कारवाई करून चालणार नाही तर यामागे असलेल्या संघटित गुन्हेगारीचा बीमोड करणे गरजेचे असून अशा लोकांविरोधात मोक्का खाली कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. यामध्ये राजकीय आशीर्वादामुळेदेखील अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
एखादी महिला अधिकारी कारवाईसाठी जात असेल तिला पुरेशी सुरक्षा देणे गरजेचे आहे, स्थानिक पोलिसांनी या कामी मदत करणे गरजेचे आहे. परंतु, येथे कुंपणच शेत खात असल्याने अशा घटना या घडतच राहणार, अशी टीकाही त्यांनी केली. फेरीवाला धोरण का झाले नाही, महापालिकेने फेरीवाला धोरण राबविणे अपेक्षित असताना ते राबविले जात नाही. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.