ठाणे : चक्रीवादळामुळे शीळ फाटा येथे कोसळलेल्या होर्डिंगरून बुधवारी महासभेत शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुन्हा केली. यापूर्वी शहरात किंवा इतर ठिकाणी होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर अनधिकृतपणे लावलेल्या होर्डिंग्जवर कारवाईची मागणी केली गेली होती. मागणी होत असली तरी अद्याप एकाही होर्डिंगवर पालिकेने कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता तरी कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
चक्रीवादळामुळे शीळ फाटा येथे होर्डिंग पडून दोन जण जखमी झाले होते. हे होर्डिंग उभारण्याची परवानगी एमएसआरडीसीने दिली होती. होर्डिंग असलेला हा रस्ता महापालिका हद्दीत येत असल्याने त्याचा कर महापालिका वसूल करीत होती. या घटनेनंतर शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा विषय ऐरणीवर आला. या होर्डिंगला एमएसआरडीसीने परवानगी दिली असली तरी शहरात अशा पद्धतीने महापालिका हद्दीत तीन होर्डिंग्ज बसवली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली. या होर्डिंग्जना स्टॅबिलिटी सर्टिफिकेट ठाणे महापालिकेने १८ जून २०१९ रोजी पुढील पाच वर्षांसाठी दिले होते. मग अवघ्या दोन वर्षांत हे होर्डिंग कसे पडले, असा सवाल मुल्ला यांनी केला. ज्या अधिकाऱ्याने हे सर्टिफिकेट दिले त्याच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला.
शहरातील इतर होर्डिंग्जबाबत देवराम भोईर, विक्रांत चव्हाण, मालती पाटील, विकास रेपाळे आदींसह इतर नगरसेवकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. नियमाबाह्य पद्धतीने फुटपाथवर होर्डिंग्ज उभारणीला परवानगी कशी दिली, शौचालयावर होर्डिंग्ज कसे उभारले, असे सवाल त्यांनी उपस्थित करून कारवाईची मागणी केली. तपासणी करून चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या होर्डिंग्जवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
..............
वाचली