ठाणे : शिळफाट्याला चक्रीवादळाच्या दिवशी पडलेल्या होर्डिंग्जच्या मुद्यावरुन बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा शहरातील अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी पुन्हा एकदा केली. परंतु यापूर्वी देखील शहरात किंवा इतर ठिकाणी होर्डिंग्ज दुर्घटना घडल्यानंतर कारवाईची मागणी केली जाते. असे असले तरी अद्यापही एकाही होर्डिंग्जवर पालिकेने कारवाई केलेली नाही, त्यामुळे आता देखील मागणी केल्यानंतर त्या होर्डिंग्जवर कारवाई होणार का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिळफाट्याजवळ चक्रीवादळाच्या दिवशी होर्डिंग पडून दोन जण जखमी झाले होते. परंतु हे होर्डिंग उभारण्याची परवानगी एमएसआरडीसीने दिली होती. तर एमएसडीसीआरचा हा रस्ता महापालिका हद्दीत येत असल्याने त्याचा टॅक्स महापालिका वसूल करीत होती. परंतु आता या घटनेनंतर या होर्डिंगसह शहरातील इतर होर्डिंग्जचा विषय देखील पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या होर्डिंग्जला एमएसआरडीसीने परवानगी दिली असली तरी शहरात अशा पद्धतीने महापालिका हद्दीत तीन होर्डिंग्ज असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली. परंतु या होर्डिंग्जची स्टेबेलिटी सर्टिफिकेट ठाणे महापालिकेने दिले होते. त्यानुसार १८ जून २०१९ रोजी पुढील पाच वर्षासाठी हे सर्टिफिकेट देण्यात आले होते. परंतु अवघ्या दोनच वर्षात हे होर्डिंग्ज कसे पडले? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांने हे सर्टिफिकेट दिलेस त्याच्यावर काय कारवाई करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, याच मुद्याच्या अनुषंगाने शहरातील इतर होर्डिंग्ज बाबतही देवराम भोईर, विक्रांत चव्हाण, मालती पाटील, विकास रेपाळे आदींसह इतर नगरसेवकांनी देखील मुद्दा उपस्थित केला. नियमाबाह्य पध्दतीने फुटपाथवर होर्डिंग्ज उभारणीला परवानगी कशी दिली? असे अनेक सवाल उपस्थित करुन अशा होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार तपासणी करुन कारवाई केली जाईल असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु यापूर्वी देखील स्थायी समिती, महासभेच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती, त्यानुसार कारवाईचे आश्वासन देखील पालिकेने केले होते. परंतु एका होर्डिंग्जवर देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आतातरी कारवाई होणार का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.