अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा रुग्णालयात आजही रुग्णांचे मृत्यु होत आहेत. त्यामुळे कळवा रुग्णालयाची क्षमता वाढविणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका रुग्णालयाची क्षमता वाढविण्याऐवजी केवळ दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधींचा खर्च करीत आहे. त्यातही गोरगरीब रुग्णांसाठी कळवा रुग्णालय हे महत्वाचे आहे. परंतु पालिका कळवा रुग्णालयाऐवजी जितो या संस्थेला अधिक महत्व देत असल्याचा गंभीर आरोप मनसचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यामुळे ग्लोबलच्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरु न करता त्याठिकाणी कळवा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जितोला पोसणार असाल तर त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एखाद्या रुग्णाला बायपास करायची असेल तर जितोच्या हाजुरी येथील रुग्णालयात अडीच लाखांचा खर्च सांगितला जात आहे. मात्र कळवा रुग्णालयात जवळ जवळ मोफत उपचार मिळत आहेत. त्यामुळे कळवा रुग्णालयाची क्षमता वाढविणे महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. परंतु पालिकेने जितोवर मेहरबानी दाखविली आहे. कॅन्सर हॉस्पीटलसाठी आम्हाला विरोध नाही, मात्र ज्या संस्थेला दिली जात आहे, त्यावर आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन्सर हॉस्पीटलसाठी दुसरी जागा पालिकेने जितोला द्यावी आणि त्याठिकाणी कळवा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले जावे अशी मागणीही त्यांनी केली. तसे होणार नसेल तर त्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. कळवा रुग्णालयाची दुरुस्ती करतांना नियमानुसार ती इमारत रिकामी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर तीन महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होणार नसेल तर होणारा खर्च हा वायाच जाणार असल्याचेही ते म्हणाले.
कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्युच्या तांडवानंतर याची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु चौकशी समिती अहवाल का आणि कोणासाठी लांबविला जात आहे. कोणावर कारवाई करायचीच नसेल तर चौकशी समितीची अट्टाहासच का केला असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.अंगावर विविध केसेस पडतीलमागील काही दिवसापासून कळवा रुग्णालय, टोल नाका किंवा जितो विषय हाती घेतला असल्याने येत्या काही दिवसात माझ्यावर विविध स्वरुपाचे केस दाखल होतील असा गोप्यस्फोटही त्यांनी केला आहे. या मागे सत्ताधाºयांचा हात असणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.