कल्याण : केडीएमसीच्या कचरा न उचलण्याच्या निर्णयाला विरोध करणाºया लोकांना अंगावर घ्या. चांगल्या कामाची सुरुवात करताना विरोध होतोच; पण घाबरू नका. ठोस आणि कठोर अंमलबजावणी करा, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी अधिकाºयांना ठणकावून सांगितले.कचरा वर्गीकरणाबाबत शुक्रवारी देवळेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मिलिंद गायकवाड, शिवसेना नगरसेविका शालिनी वायले, माजी नगरसेवक सुनील वायले उपस्थित होते.देवळेकर यांनी सांगितले की, हॉटेलवाले नफा कमावतात. त्यांनी त्यांचा ओला कचरा व उष्टे अन्न हे घंटागाड्यांकडे वेगळे करून दिले पाहिजे. विविध सोसायट्या तसेच २० हजार चौरस मीटर आकारमानाच्या सोसायट्यांनी कचरा वर्गीकरण करून ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्याचे नैसर्गिक विघटन केले पाहिजे. सोसायटीत विविध सोयीसुविधांसाठी जागा असते. मग, कचºयावर प्रक्रियेसाठी जागा नाही, अशी सबबच मुळात लंगडी वाटते. दोन नगरसेविकांनी त्यांच्या प्रभागात नगरसेवक निधीतून प्रत्येकी १० लाख खर्चून वेस्ट क्रश मशीन बसवले आहे. त्यांचा हा उपक्रम चांगला असला, तरी अन्य प्रभागांतील नागरिकांनी अशा प्रकारची अपेक्षा करू नये. सगळ्याच प्रभागात वेस्ट क्रश मशीन कशा बसवता येतील. एका प्रभागात समजा २०० इमारती असल्यास या मशीनसाठी नगरसेवकाचा निधी तेथे कसा पुरेसा पडेल? सगळ्या सोसायट्यांनी याचा विचार केला पाहिजे. महापालिका आर्थिक अडचणीत आहे. महापालिका घनकचराकर आकारत नाही. म्हणून, महापालिकेकडून अशा प्रकारची सेवा मागणे कितपत योग्य आहे. कचरा उचलणे महापालिकेची जबाबदारी आहे, तसे कचºयाचे वर्गीकरण करून देणेही नागरिकांची जबाबदारी आहे....तर मालमत्ताकरातपाच टक्के सूट?कचºयाचे वर्गीकरण करणाºयांना मालमत्ताकरात पाच टक्के सूट देण्याचा विचार केला जाईल. तसेच वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई केली पाहिजे. प्रत्येक सोसायटी, घर, चाळ, आस्थापना यांना गतीने नोटिसा बजावा.कचरा वर्गीकरण करणे त्यांना काही कठीण नाही. त्यांच्याकडून वर्गीकरण झाल्यास ओला कचरा डम्पिंगवर जाणारच नाही. तर, सुक्या कचºयाचे महापालिका आपल्या कचराशेडमध्ये वर्गीकरण करेल. फेरीवाल्यांनाही कचºयासाठी बकेट ठेवली पाहिजे, असे देवळेकर यांनी स्पष्ट केले.
लोकांना अंगावर घ्या; महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:50 AM