ठाणे : गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या ठिकाणी साथीचे रोग पसरणार नाहीत, याची दक्षता घेतानाच तेथील कचरा उचलणे, साफसफाई करणे तसेच त्याठिकाणी फवारणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते नियमितपणे भरण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
गेले काही दिवस शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते, तसेच रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील खड्डे तातडीने भरणे, कचरा उचलणे, चेंबर कव्हर बसवणे तसेच शहरात फवारणी करणे आदी कामे महत्त्वाची असल्याने त्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या. शहरामध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देतानाच याबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे अधिकाºयांना सांगितले. शहरामध्ये ज्या ठिकाणी चेंबर कव्हर नाहीत, त्यांची पाहणी करून ती युद्धपातळीवर बसवण्यात यावीत तसेच त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून त्याच्या नियमित नोंदी करणे व वरिष्ठांना अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.