लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. त्यात कधी पाऊस तर कधी ऊन पडत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसू लागला आहे. यंदा जुलै महिन्यात तापमानाने ३७ अंशाचा पल्ला पार केला आहे. मागील दहा वर्षांत कधी नव्हे अशा पद्धतीने ठाण्यात तापमानाचा पारा चढतांना दिसून आला. त्यामुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने काही दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान वाढत आहे. त्यामुळे हवेतील उष्मा वाढत आहे. शहरात झालेली बेसुमार वृक्षतोड वाढलेले काँक्रीटचे जंगल यामुळे तापमान मागील काही वर्षांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच जूनमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता; परंतु काही दिवसांपासून तो गायब झाल्याने शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली. गुरुवारी पाऊस पडला असला तरी त्याच्या आदल्या दिवशी ठाण्याचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले हाेते. परिणामी, नागरिकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. पावसाळ्यात पावसाचा नव्हे तर उष्म्याचा सामना करण्यासाठी नागरिक छत्रीचा वापर करीत असल्याचे दिसून आले. त्यातही तापमानाच्या सततच्या या चढ-उतारामुळे नागरिकांना आता आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ताप, थंडी, हगवण आदींसह इतर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
असा मोडला ‘जुलै’चा रेकॉर्ड
२००१ -२७ अंश
२००५ - २९
२०१० - २८
२०१५ - ३०
२०१८ - ३१
२०२० - २९
२०२१ - ३७ अंश
सरासरी तापमानात सात अंशांची वाढ
दरवर्षी जुलै महिन्यात ठाण्याचे तापमान हे साधारणपणे ३० अंश सेल्सिअसच्या आसपास दिसून येत आहे; परंतु यंदा पहिल्या आठवड्य़ात हेच तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. त्यामुळे यंदा तापमानात सरासरी ६ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
एक आठवडा असा जाणार
मागील आठवडाभर तापमानात वाढ होताना दिसत होती; परंतु आता ८ जुलैपासून पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याने शहराचे तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील असे दिसून येत आहे. त्यामुळे आठवडाभर ठाणेकरांना वाढीव तापमानाचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे दिसत आहे.
ठाण्यात किती दिवस तापमान असेच राहील
ठाण्यात गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर पाऊस राहणार असल्याने, तापमानात फारशी वाढ होणार नसल्याचे दिसत आहे. ८ जुलै रोजी तापमान ३२ अंश सेल्सिअस दिसून आले आहे. तर ३१ जुलैपर्यंत पाऊस असाच पडला तर ठाण्याचे तापमान हे २८ अंश सेल्सिअस एवढे राहणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.
आरोग्य सांभाळा
जुलै महिन्यात कधी नव्हे एवढ्य़ा प्रमाणात वाढ होताना दिसून आली आहे. त्यात कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन पडत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकणार आहे. ताप, थंडी, सर्दी, हगवण असे आजार बळावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उघड्य़ावरचे पदार्थ खाणे टाळावे, पावसात भिजू नये. शक्यतो पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे मत डॉ. आर. टी. केंद्रे यांनी व्यक्त केले आहे.
.............
ठाणे खाडीत वाढलेले प्रदूषण, खाडीत गाळ साचल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होत आहे. हा हरित वायू असल्याने शहराचे तापमान वाढवत आहे. तसेच शहरात लाखोंच्या संख्येत वाढलेली वाहनांची संख्या त्यातून निघणारा धूर याला कारणीभूत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता तरी त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात याची मोठी किंमत ठाणेकरांना चुकवावी लागणार असल्याचेही सांगितले जात आहे.