लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिलांच्या छोट्यामोठ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांकडे वेळीच लक्ष दिले तर कदाचित भविष्यात त्यातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा होणार नाही. महिलांना, तरुणींना पोलिसांकडे येऊन तक्रार करण्याबाबत विश्वास वाटला पाहिजे, तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, अशी तंबी शिंदे यांनी दिली.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन वास्तू, इमारती, बंद कारखाने या भागांत गस्त वाढविण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. ठाणे जिल्ह्यात गस्तीसाठी अधिक दुचाकी, चारचाकी वाहने उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदर येथील पोलीस आयुक्त, ठाणे व पालघरचे पोलीस अधीक्षक, ठाण्याचे जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
...........
वाचली