कल्याण : घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र, घरातून गेलेली व्यक्ती कधीही परत येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्राणापेक्षा जास्त आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कल्याणमध्ये बुधवारी केले.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पश्चिमेतील मंगेशी बँक्वेट सभागृहात बुधवारी सायंकाळी झाला. यावेळी ते बोलत होते.घरामध्ये अनेक व्यक्ती असतानाही चोरी होते, ज्याची घरातील मंडळींना अजिबात माहिती नसते. मात्र, पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा आणि आपला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. हा मुद्देमाल परत मिळवणे आणि ओळख पटवून संबंधित व्यक्तीला परत करणे हा अत्यंत खडतर, असा प्रवास असल्याचे फणसळकर यांनी यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात विविध पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने, महागडे मोबाइल, आलिशान गाड्या, दुचाकी आणि रोकड, असा एक कोटी १७ लाख रुपयांचा ऐवज संबंधितांना समारंभात सन्मानपूर्वक परत केला.यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक आयुक्त अनिल पोवार व दिलीप राऊत यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, मंगळसूत्रांसह अन्य दागिने, मोबाइल आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.>सतर्क राहणे आवश्यकपोलिसांच्या सतर्कतेमुळे आमचा ऐवज आम्हाला परत मिळाला आहे. असे असले तरी, आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्यामुळे, अशा स्वरूपाच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे आपण पोलिसांची सहायता करण्याबरोबरच एक चांगले नागरिक बनण्याचे कर्तव्य पार पाडू शकतो, असे मत मंजू दुबे यांनी यावेळी व्यक्त केले.>वाईट गोष्टींचे चांगल्यात रूपांतरआपल्या जीवनात चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. आपल्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्याने आज आपण इथे आलो आहोत. पण, त्या वाईट गोष्टींचे चांगल्यामध्ये रूपांतरण करून त्या गोष्टी हस्तांतरण करण्याचे काम पोलिसांनी केले असल्याचे मत महेश वाघ यांनी व्यक्त केले.>सव्वा कोटींचा मुद्देमाल केला होता परत : ठाणे ग्रामीण पोलिसांनी १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरी आणि जबरी चोरीदरम्यान चोरीला गेलेले दागिने, मोबाइल, मोटारसायकल असा एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल ४५ फिर्यादींना अलिकडेच परत केला होता. त्यामध्ये अंबरनाथ येथील निवृत्त लेफ्टनंट सनी थॉमस यांची सेवा पदके आणि रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवजाचाही समावेश होता.
वस्तूंपेक्षा आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, विवेक फणसळकर यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:16 AM