डोंबिवली - मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भेटीदरम्यान केली. तत्पूर्वी त्यांनी या प्रश्नाबद्दल लोकसभेत आवाज उठवला. उपनगरी सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.रेल्वे ही मुंबईकरांची जीवनरेषा आहे. दररोज ४२ लाख ५० हजार प्रवासी लोकलने प्रवास करतात. तर, लोकलच्या दररोज एक हजार ७७२ फेऱ्या होतात. मात्र, महिनाभर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने नोकरदारांना बसत आहे. कार्यालयात पोहोचायला विलंब होत असल्याने लेटमार्क लागत आहे. मेगाब्लॉक घेऊनही रेल्वे वेळेवर धावत नाही. उपनगरी सेवेतून सर्वाधिक महसूल मिळूनही येथे समस्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यातून पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.लोकलचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल धीम्या मार्गावर अथवा धीम्या लोकल जलद मार्गावर वळवाव्यात. कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तेथे जादा लोकल सोडाव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी यावेळी केली.रुळांमध्ये पाणी साचू देऊ नकारेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात शंका उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून १० मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधावी. जेथे जास्त पाणी साचते, तेथे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.
रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 1:20 AM