ठाणे : स्मशानभूमीच्या मुद्यावरील वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पोखरण-१ आणि २ भागातील स्मशानभूमींना यापूर्वी विरोध झाला होता. परंतु, आता या भागातील स्मशानभूमींची कामे मार्गी लागावीत, या उद्देशाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच धाव घेतल्यानंतर त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.मागील महासभेच्या वेळेस भार्इंदरपाडा भागात होणाऱ्या सामूहिक स्मशानभूमीच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. तिला विरोध करताना पोखरण-१ आणि २ भागांतील स्मशानभूमींचा मुद्दा आधी मार्गी लावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी केली होती. विशेष म्हणजे साधारणपणे दीड वर्षापूर्वीदेखील या स्मशानभूमीच्या मुद्यावरून सरनाईकविरुद्ध राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक असा वाद निर्माण झाला होता. पोखरण भागातील स्मशानभूमीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने विरोध केला होता. त्यामुळे तिचे काम रखडले होते. परंतु, आता भार्इंदरपाडा स्मशानभूमीच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही स्मशानभूमींचा मुद्दा सरनाईक यांनी रेटून धरला आहे. महासभेत त्यांनी केलेल्या मागणीला प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेऊन निवेदनही सादर केले आहे. या निवेदनामध्ये पोखरण रोड नं. १ परिसरातील वर्तकनगर, शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर तसेच पोखरण रोड नं. २ परिसरातील वसंत विहार, लोकपुरम, हिरानंदानी मिडोज व टिकुजिनीवाडी परिसरात हिंदू समाजाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असून या परिसरात येऊरच्या पायथ्याशी रामबाग येथे एकमेव स्मशानभूमी उपलब्ध होती. परंतु, तिचा वन खात्याच्या जागेतून जाणारा रस्ता हा न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केला असून आता तेथे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ती बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाकडे ८ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनसुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.तसेच पोखरण रोड नं. १ आणि २ परिसरात महापालिकेचे स्मशानभूमीचे आरक्षण नसल्याने विकासकाकडून आलेल्या सुविधा भूखंडावर ती उभारल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी) राजकीय नेते प्रस्ताव रद्द करतात एखाद्या सुविधा भूखंडावर प्रस्ताव ठेवला की, विकासक हा राजकीय नेते अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदरचा प्रस्ताव रद्द करतो, असा आरोपही सरनाईक यांनी केला असून ज्याप्रमाणे भार्इंदरपाडा येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारून सर्व धर्मीयांच्या स्मशानभूमी, दफनभूमी, कबरस्थानाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे पोखरण रोड नं. १ आणि २ परिसरात स्मशानभूमीची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
स्मशानभूमींचा तत्काळ निर्णय घ्या
By admin | Published: March 30, 2017 6:35 AM