उल्हासनगर - नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.टाउन हॉलमध्ये मेडिकल असोसिएशनच्या वतीने रविवारी झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. अत्याधुनिक उपचारपद्धती, शस्त्रक्रियेची माहिती, कॅन्सरसह विविध रोग, नवीन औषधे, अत्याधुनिक मशीन आदींची माहिती तज्ज्ञांनी दिली. उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरांतील तब्बल ८०० डॉक्टरांनी चर्चासत्राला हजेरी लावली होती.मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजू उत्तमानी, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश नाथानी, डॉ. करिष्मा बालानी आदी उपस्थित होते. फडणवीस, महापौर मीना आयलानी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.मागील काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा-ओमी टीमच्या उमेदवाराचा पराभव झाला. अर्थात याला भाजपातील अंतर्गत वादही कारणीभूत ठरला. यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही धक्का बसला. ही पोटनिवडणूक भाजपा-ओमी टीमने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीने ही जागा ताब्यात ठेवली.राजकीय नव्हे, सामाजिक कार्यक्रमभाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी व ओमी कलानी यांच्यामध्ये महापौर, आमदारपदावरून स्पर्धा लागली आहे. त्यांच्यातील स्पर्धा लपून राहिलेली नाही. आयलानी यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या पत्नीला कार्यक्रमाला बोलवून ओमी टीमवर दबाव आणल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, हा कार्यक्रम राजकीय नव्हे तर सामाजिक असल्याची प्रतिक्रिया कुमार आयलानी यांनी देत श्रेयवादाच्या लढाईला पूर्णविराम दिला.
अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा - अमृता फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:36 AM