उल्हासनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवा. त्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी उल्हासनगर महापालिकेला दिले. यावेळी आवश्यक निधीही उपलब्ध करण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दुपारी ४ वाजता उल्हासनगरमध्ये दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पालिका करत असलेल्या उपाययोजनांविषयी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून आढावा घेतला. वाढणाºया रुग्णसंख्येमुळे अनेकांना उपचारांविना राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका स्तरावर जे शक्य होईल, त्या उपाययोजना राबवा, असे निर्देश आयुक्तांना ठाकरे यांनी दिले. आढावा बैठकीला पालकमंत्र्यांसह आमदार बालाजी किणीकर, महापौर लीलाबाई अशान, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आदी उपस्थित होते. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन व्यापाºयांच्या समस्यांचे निवेदन दिले. तर, ठाकरे यांच्या भेटीनंतर महापालिका प्रशासन जागे होईल, अशी टीका मनसेने केली. महापालिकेची सुखसुविधा कागदावर असून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याचे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले.
५० कोटींच्या निधीची मागणी : कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठी ५० कोटींच्या निधीची मागणी यावेळी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत यावेळी वधारिया यांनी व्यक्त केले. ज्या घरातील व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला, त्या कुटुंबाला वेळीच क्वारंटाइन केले जात नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप वधारियांनी केला.