लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका हद्दीत येणाऱ्या मध्य रेल्वेमार्गावरील पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे रेल्वे प्रवासी संघाबरोबर झालेल्या बैठकीत दिले. या बोगद्यावरील समस्यांबाबत ठाणे पारसिक रेल्वे संघटनेबरोबर महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीस ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी नंदकुमार देशमुख, लता अरगडे, सुधाकर पतंगराव, अभिजित धुरत, वंदना सोनावणे, सुमती गायकवाड तसेच प्रशासनाच्या वतीने उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.गेल्या वर्षी बोगद्यावरील संरक्षक भिंत कोसळली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाय करण्यासाठी महापौरांनी यापूर्वी प्रशासनास कळवलेले आहे. तथापि, प्रवासी संघटनेच्या निवेदनानुसार महापौरांच्या दालनात ही बैठक झाली. त्यात संबंधितांशी चर्चा करून मुंब्रा बाजूस संरक्षण भिंतीचे काम चालू असून ते त्वरित पूर्ण करणे, कळवा बाजूस असलेला कचरा हटवणे, मोडकळीस आलेल्या शौचालयास पर्यायी व्यवस्था करून ते हटवणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी कामे करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडून रेल्वे प्रशाशांबरोबर येथील नागरिकांच्यादेखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. येथील नागरिकांचे पुनर्वसन करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आदींबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी महापालिका तसेच रेल्वे प्रशासन, वन विभाग आणि रेल्वे प्रवासी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही महापौरांनी या वेळी स्पष्ट केले.
रेल्वेच्या पारसिक बोगद्यावर सुरक्षिततेची उपाययोजना करा
By admin | Published: June 03, 2017 6:22 AM