ठाणे : रायगड मध्ये इर्शाळवाडीत झालेल्या दरड दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासन देखील आता खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबधीत विभागाची बैठक घेऊन ज्या ज्याठिकाणी दरड कोसळण्याची ठिकाणे आहेत, त्या प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्तांना त्या त्या भागांची पाहणी करुन आढावा घ्यावा तसेच करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत मुंब्रा, कळवा, घोडबंदर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीत १४ ठिकाणे आहेत, त्याठिकाणांचा आढावा आता घेतला जाणार आहे.
महापालिकेने केलेल्या सर्व्हेत नाल्याच्या बाजूला आणि डोंगराच्या जवळ असलेल्या १४ भागांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना महापालिकेने एप्रिल महिन्यात नोटीस बजावल्या आहेत. तसेच घरे खाली करुन इतर ठिकाणी निवाऱ्याची सोय करावी असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष स्वरुपात नोटीस न बजवता पालिकेने जाहीरातींच्या माध्यमातून त्या त्या भागातील नागरीकांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. परंतु आजही येथे रहिवाशांचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे.
पावसाळा आला की दरवर्षी पालिकेच्या माध्यमातून ही यादी तयार केली जात आहे. दरवर्षी येथील रहिवाशांना नोटीसा बजावल्या जात आहेत. तसेच घरे खाली करण्याचेही सांगितले जात आहे. परंतु पुढील कारवाई काही होतांना दिसत नाही. मागील वर्षी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपली घरे रिकामी करुन इतर ठिकाणी वास्तव्य करावे असे आवाहन देखील पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परंतु रहिवासी देखील घरे खाली करण्यास तयार नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे.
दरम्यान आता रायगडमध्ये घडलेल्या घटनेनंतर महापालिका प्रशासन जागे झाले असून गुरुवारी या संदर्भात आयुक्तांनी बैठक घेऊन संबधींत सहाय्यक आयुक्तांना सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्या भागांची पाहणी करुन आढावा तयार करुन पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सुचनाही देण्यात आली आहे. याशिवाय पोलीस, महसुल विभागाला देखील सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असून गरज भासल्यास येथील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात बाजूला असलेल्या शाळेत स्थलांतरीत केले जाईल असेही सांगण्यात आले आहे.
'ही' आहेत १४ ठिकाणेमुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्य नगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वर नगर, पौंड पाडा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदीरलगत, केणी नगर, सैनिक नगर आणि कैलास नगर आदी भागांचा यात समावेश आहे.