ठाणे - बेस्ट प्रमाणे ठाणे परिवहन समिती अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी आणि या ठिकाणी चुकीच्या पध्दतीने सुरु असलेल्या कारभाराला आळा घालण्यासाठी शनिवारच्या महासभेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी लक्षवेधी मांडली होती. परंतु त्यावर चर्चा जरी झाली नसली तरी पुढील महासभेत टिएमटी संदर्भात श्वेत पत्रिका काढण्यात यावी अशी मागणी मुल्ला आणि नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतरच परिवहनवर चर्चा केली जाईल असेही स्पष्ट केले आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या चुकिच्या निर्णयामुळे बेस्ट सेवा डबघाईला आली असून कामगारांना आपल्या हक्कासाठी ऐतिहासिक आंदोलन उभारावे लागले होते. ठाण्यातील टीएमटीचीसुध्दा तिच अवस्था असून येथील वादग्रस्त कारभाराची परंपरा थांबवून टीएमटीला तारण्याची गरज आहे. त्यामुळे टीएमटीच्या कारभाराची एक श्वेतपत्रिका काढून पालिका किंवा टीएमटीने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सभागृहात लक्षवेधी सुचनेव्दारे केली. त्यानुसार पुढील सर्वसाधारण सभेत ही माहिती सादर करून सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाच्यावतीने सभागृहात देण्यात आली आहे. सध्या नादुरूस्त असलेल्या टीएमटीच्या १५० बस दुरूस्त करून त्या खासगी ठेकेदारामार्फत जीसीसी तत्वावर चालविण्याचे पालिकेचा नियोजन आहे. त्यासाठी गेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉग्रेसने विरोध केला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर तो प्रस्ताव मंजुर केला. या जीसीसी कराराच्या विरोधात नजीब मुल्ला यांनी आक्र मक भूमिका घेतली असून डबघाईला आलेल्या टीएमटीच्या विषयावर त्यांनी शनिवारच्या सभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी त्याला अनुमोदन दिले होते. सभागृहात लक्षवेधी सुचना वाचल्यानंतर सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी आपली बाजू मांडली. लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे सभेच्या विषयपित्रकेवरील विषय मंजुर करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे ही लक्षवेधी सुचना पुढिल सभेत चर्चेसाठी घ्यावी अशी विनंती म्हस्के यांनी मुल्ला आणि जगदाळे यांना केली. नजीब मुल्ला यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिला. मात्र, टीएमटीच्या एकूणच कारभाराविषयी चर्चा होणे गरजेचे असून त्यासाठी या विभागाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली. ती मागणी सभागृहनेत्यांनी मान्य केली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत तशी श्वेतपत्रीका प्रशासन काढते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे परिवहन सेवेची श्वेतपत्रिका काढा, राष्टÑवादीच्या नगरसेवकांची महासभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:26 PM
परिवहनच्या सध्या सुरु असलेला कारभार असाच सुरु राहिला तर परिवहन सेवेवर सुध्दा बेस्टसारखी वेळ ओढावू शकणार आहे. त्यामुळे परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लावून धरली आहे.
ठळक मुद्देपुढील महासभेत श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासनलक्षवेधीवर चर्चा झालीच नाही