भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नळजोडण्यांच्या मंजुरीसाठी वास्तव्याचा जुना पुरावा दाखवण्यासाठी सर्रास बनावट ओळखपत्रांचा वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र, तहसीलदारांकडून दिला जाणारा वास्तव्याचा दाखला तसेच महापालिकेचा बनावट जन्म दाखला सादर करून सर्रास नळ जोडण्या मंजूर केल्या जातात. पालिका प्रशासनही कोणतीही खातरजमा न करता नळजोडण्या मंजूर करत असल्याने बनावट ओळखपत्रे आदी बनवणारी टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले आहे. विशेषत: सरकारी जागांवर वसलेल्या बेकायदा बांधकामांसाठी बनावट पुरावे वापरले जात आहेत.
एमआयडीसीकडून मंजूर ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नंतर तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी २०१७ मध्ये नवीन नळजोडण्या देण्याचे पुन्हा सुरू केले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व मंजुरी प्रक्रिया आॅनलाईन केली होती. नळजोडण्या देण्यासाठी कार्यरत दलालांना आळा घालण्याचा उद्देश पालिकेने बोलून दाखवला असला तरी अनेक नगरसेवकांच्या ओळखपत्र लावलेल्या फाईली पाणीपुरवठा विभागात झटपट पुढे सरकत होत्या.
झोपडपट्ट्यांमध्ये पाच घरामागे एक सामूहिक नळजोडणी तर इमारतींना १५ सदनिकांमागे एक जोडणी मंजूर केली जात आहे. बेकायदा बांधकामांना २०११ पूर्वीच्या पुराव्यांचा आधार घेऊन सर्रास नळजोडण्या मंजूर केल्या जात आहेत. त्यातही कागदपत्रांची पूर्तता नसणाऱ्यांनाही नळजोडण्या मंजूर केल्या आहेत. कांदळवनमधील सरकारी जमिनी बळकावून बेकायदा बांधकामे करणाऱ्यांनाही नळ जोडण्या मंजूर केल्या जातात.
भार्इंदरच्या राई शिवनेरी हा पत्ता असलेल्या मतदार ओळखपत्रात एका महिलेचे नाव आहे. ९५ मध्ये तीचे वय १८ वर्ष दाखवले असले तरी विधानसभा मतदार संघात नावच आढळले नाही. एका व्यक्तीच्या ओळखपत्रातही तसाच प्रकार आहे. महापालिकेचे बनावट जन्मदाखले बनवले आहेत. त्यातही दिनांक व पत्ता आदी खोटा टाकला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून दिला जाणारा वास्तव्याचा दाखलाही बनावट बनवला जात आहे.नळजोडण्या मिळवण्यासाठी सर्रास बनावट ओळखपत्रे, दाखले वापरले जात असताना अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नळजोडणी मंजूर करण्याआधी कनिष्ठ अभियंत्यामार्फत घराची पाहणी केली जाते. त्यावेळीही सादर केलेले पुरावे खरे आहेत का? याची पाहणीच होत नाही हे स्पष्ट होते.
... तर कारवाई करूया प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद होता. शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनीही फोन उचलला नाही. तर अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने यांनी या प्रकरणी चौकशी करून बनावट पुुरावे आढळल्यास त्यावर आवश्यक कार्यवाही करू. दिलेल्या नळजोडण्या रद्द करू असे सांगितले.