भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त कंदमुळे शेतीकडे वळल्यास जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा केवळ संदेश न देता कृती करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन तालुक्यात कंदमुळांची शेती करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा हा पहिलाच; पण फलदायी उपक्रम ठरल्याने आता पुढील वर्षी याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बाबांनी स्वतः दोन एकर जागेत एक हजार ५०० क्विंटल सुरण या बियाण्याची लागवड केली. अनेक वर्षांपासून ही लागवड करीत असताना आपल्या शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता सुरणाची शेती केल्यास ती फलदायी ठरेल, असे बाबांच्या मनात आले आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केले, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही सुरण या कंदमुळे शेतीच्या लागवडीखाली आली आहे.
कंदमुळे ही माळरानावर भुसभुशीत जागी कुठेही येतात. केवळ मातीची भर दिली की झाले. कोणतीही मेहनत नाही. खतांची गरज नाही की, कोणत्या रोगाची भीती नाही. मुबलक पाऊस. मग केवळ उत्पादन, अशी अनेक कंदमुळे आहेत, जी जीवनावश्यक आहेत आणि आयुर्वेदिकही आहेत. जी आपणास आवश्यक आहेत. रताळी व सुरण यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच समृद्ध करण्यास मदत हाेईल, असा सल्ला बाबांनी दिला. ही सर्वच कंदमुळे दाटीवाटीने लावली तरी चालतात. त्यापैकी सुरण हे पाव किलो, अर्धा किलोच्या वजनाचे एक फळ याप्रमाणे बियाणे असते. ते तीस ते चाळीस रुपयांना पडते. त्यापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. एकदा बियाणे उपलब्ध झाले की, मग त्याच सुरणाच्या रोपापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. हेच फळ साठ ते सत्तर रुपयांना विकले जाते, अशी अनेक रोपे तयार झाल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना तालुक्यात बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मनोहर वेखंडे, काळूराम दिनकर, दशरथ साबळे, वसंत कुडव, जानू विशे यांच्यासह अनेकांनी ही शेती केली आहे.
काेट
बाबांच्या सल्ल्यानुसार सुरणाची शेती माळरानावर केली आहे. मे महिन्यात ती केल्याने आता सहा ते सात किलो वजनाचे सुरण तयार झाले आहेत. रोपेही तयार झाल्याने ही शेती अधिक फलदायी ठरणार आहे.
-बाळाराम निचिते, शेतकरी
..................................
तालुक्यातील शेतकरी कंदमुळांच्या शेतीकडे वळत असल्याने ती शेती नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या शेकडो एकर माळरानावर ती केली जात आहे. ही चांगली बाब आहे.
-अमोल आगवणे, शहापूर तालुका कृषी अधिकारी