ठाणे : कुटुंबात बाईची मुळे जितकी खोल जातात तितकी ती विस्तारते. पुरूष शक्यतो पाय वर ठेवून उंच उडायला पाहतो आणि स्त्री शक्यतो खाली जाऊन वर बहरत जाते. आजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते. या विसंगतीचा स्वीकार करणे मोठी गरज आहे. स्त्री जीवनाचा विचार करुन त्यांना माणूस पातळीवर आणून त्यांचे हक्क अधिकार देणे खूप अवघड आहे अशा भावना मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केल्या. सृजन संपदा, दिल्ली आणि अमेय प्रकाशन, पुणे आयोजित चिंतनशील लेखिका नयना सहस्त्रबुद्धे लिखित स्त्रीभान पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सहयोग मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक उल्हास लाटकर उपस्थित होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, अनंतकाळ गुढ असेच आपण स्त्रीला पाहत आलो याचे कारण स्त्री म्हणजे निमिर्ती आहे आणि त्याचा अनुभव वारंवार घेत आलो आहोत. माणूस म्हणून स्त्री पुरूष एकत्र येत नाही याचा विचार आपण करत नाही. भारतीय संस्कृती ही विसंगतीचा स्वीकार करणारी आहे. संस्कृती ही स्थिर गोष्ट नाही ती बदलत राहते. स्त्रीयांच्या सगळ््या प्रश्नांना, आकांक्षांना, प्रेरणांना, कतृत्वांना शब्द मिळाला तो साहित्यातून. तिचे पुरूष आणि स्त्रीयांकडूनही साहित्यातून प्रश्न मांडले गेले. भारतीय स्त्रीवाद किंवा दृष्टी ही पुरूषांविरोधी असूनच शकत नाही. त्याकाळात अनेक सुधारक पुरूष स्त्रीयांमागे उभे राहिले, यातून आकार मिळत गेला म्हणून पुरूष विरोध इथे झाला नाही. आजही सुशिक्षित स्त्रीया एकमेकांना भेटल्या तर त्यांचे विषय आणि पुरूषांचे विषय यात फरक असतो. पुरूष हे राजकारणाबद्दल तर स्त्रीया या रजा, बदली, मुलांचे करिअर, कुटुंब यांबद्दल बोलतात. स्त्रीयांनी राजकारणात प्रवेश करताना काही दृष्टी ठेवून करावा. स्त्रीया पारंपारिक वेढ्यात अडकल्यात, स्त्री प्रश्नांची, स्त्री जीवनाची अनेक अंगाने उकल करण्याची गरज आहे. आपल्याकडे स्त्रीवाद रुजला नाही आणि रुजणारही नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पुरुष घरातल्या स्त्रीयांबद्दल सन्मानाने बोलतात पण आजूबाजूच्या स्त्रीयांबद्दल मात्र तसे बोलत नाहीत अशी खंत व्यक्त करीत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, समाजात सर्वच स्त्रीयांबाबत सन्मानाची भावना उमटावी अशी अपेक्षा सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली. नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर म्हणाले, या पुस्तकात रोजच्या जीवनाशी सांधा भिडवला गेला आहे. चिंतनशील लेखिका आणि चिंतनशील कार्यकर्तीचे जगणे यात उलगडले आहे. या पुस्तकातील स्त्रीभान स्त्री विरुद्ध पुरुष असे नसून यात पुरुष मानसीकतेचाही विचार केला आहे. हे पुस्तक संघर्षाचे नसून सहअस्तित्वाचे आहे. ते खऱ्या अर्थाने भारतीय समानता किंवा भारतीय स्त्री मुक्तीच्या दृष्टीने विचार करणारे असून माणूसपणाचे भान देणारे हे पुस्तक आहे. आपण स्त्री की पुरूष आहोत यापेक्षा आपण चांगले माणूस आहोत का़़? असा प्रश्न त्यांनी प्रेक्षकांसमोर उपस्थित केला. सुत्रसंचालन वृंदा टिळक यांनी केले.
आजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते : डॉ. अरुणा ढेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 5:32 PM
अनेकदा वाचनातून, अनुभवातून, माध्यमातून, शिल्प, चित्र, नाटक, संगीतातून स्त्रीची रुपे पाहिली तरी स्त्री जीवन समजायला अवघड आहे असे मत डॉ. अरुढा ढेरे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देआजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना विसंगतीला सामोरे जावे लागते : डॉ. अरुणा ढेरेलेखिका नयना सहस्त्रबुद्धे लिखित स्त्रीभान पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्नया पुस्तकात रोजच्या जीवनाशी सांधा भिडवला गेला : अभिराम भडकमकर